प्रत्येकाने बुस्टर डोस घ्यावा
प्रतिनिधी/ पणजी
आरोग्य खाते कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करण्यास पूर्ण सज्ज असून प्रत्येकाने बुस्टर डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर, डॉ. राजेंद्र बोरकर व डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी काल मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
वेगवेगळ्य़ा इस्पितळात काम करणाऱया सर्व आरोग्य कर्मचाऱयांना तसेच 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना हा बुस्टर डोस मोफत आहे. त्यासाठी त्यांना आरोग्य केंदात नाव नोंदणी करावी लागणार आहे.
खासगी इस्पितळात बुस्टर डोस 386 रु.
18 वर्षे ते 59 वर्षांपर्यंतच्या वयोगटातील व्यक्तींना बुस्टर डोस विकत घ्यावा लागेल. तो फक्त मोजक्याच खासगी इस्पितळात उपलब्ध आहे. खासगी इस्पितळ त्यासाठी 386 पेक्षा अधिक पैसे आकारु शकत नाही, असे त्यांनी सांगितले. लसीकरणाचे पहिले दोन्ही डोस सर्वांना मोफत आहे, मात्र तिसरा बुस्टर डोस विकत घ्यावा लागेल. या बुस्टरची सक्ती करण्यात आलेली नाही, पण चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने हा डोस घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुलांच्या पहिल्या डोसला चांगला प्रतिसाद
मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या डोसला 92 टक्के प्रतिसाद मिळाला तर दुसऱया डोससाठी 77 टक्के प्रतिसाद मिळाला. परीक्षा असल्यामुळे काही पालकांनी मुलांना लसीकरणाला पाठवले नाही. परीक्षा संपल्यानंतर काहीजण पर्यटनालाही गेले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुसऱया डोसला कमी प्रतिसाद मिळाला असावा, असे ते म्हणाले.
आता फक्त गुरुवारी लसीकरण
यापुढे लसीकरण फक्त गुरुवारीच कुठल्याही आरोग्य केंद्रात होणार आहे. कुठल्याही वयाच्या व्यक्तींसाठी डोस मोफत उपलब्ध असेल. पालकांनी आपल्या मुलांना नजिकच्या आरोग्य केंद्रात गुरुवारी न्यावे तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोफत तिसऱया बुस्टर डोसची संधी घ्यावी, अशी माहिती त्यांनी दिली.
गोव्यात सध्या ऑमिक्रॉन बी.ए.2 चा संसर्ग
गोव्यात सध्या जो कोरोना जीवाणू पसरत आहे तो ऑमिक्रॉन बी.ए.2 असल्याचे आढळले आहे. यापूर्वी बी 1 व्हायरंट होता. तिसऱया लाटेत 99.51 टक्के रुग्ण कोरोनातून बचावले. फक्त ज्यांना जटील व्याधी होत्या अशा अवघ्या काही जणांना कारोनामुक्त होणे शक्य झाले नाही, असे त्यांनी सांगितले.
म्हापशात जिल्हा रुग्णालयात चाचणीची सोय
म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात सर्व प्रकारच्या कोरोना व्हेरियंटची चाचणी होऊ शकते. त्यासाठी नमुने पुण्याला पाठवण्याची आवश्यकता नाही. जे विदेशात जाणार आहेत त्यांना कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र लागते ते देण्याची सोय आता करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.