चित्रपटात साकारतेय अत्यंत अनोखी व्यक्तिरेखा
दिवाळीचा मुहूर्त साधून रकुल प्रीत सिंहने स्वतःचा आगामी चित्रपट ‘छतरीवाली’चे चित्रिकरण सुरू केले आहे. रकुलने सोशल मीडियाद्वारे याची माहिती दिली आहे. रकुलने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर केल्या आहेत. एका चित्रफितीत रकुल सेटवर लक्ष्मीपूजन करताना दिसून येते. चित्रिकरण लखनौमध्ये सुरू झाले आहे. याचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देओस्कर करत आहेत. या चित्रपटात रकुल अत्यंत वेगळय़ा प्रकारची व्यक्तिरेखा साकारत आहे.
छतरीवाली हा एक सामाजिक उपहास दर्शविणारा चित्रपट आहे. यातील व्यक्तिरेखेसाठी पूर्वी सारा अली खान आणि अनन्या पांडे यांना विचारणा करण्यात आली होती. या दोघींनीही नकार दिला होता. त्यानंतर रकुलला या व्यक्तिरेखेची ऑफर देण्यात आली होती.
रकुल याचबरोबर आयुष्मान खुरानासोबत ‘डॉक्टरजी’ या चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपटात ती फातिमा नावाच्या डॉक्टरची भूमिका साकारत आहे. याचबरोबर अजय देवगणच्या ‘मे-डे’ चित्रपटात ती काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अजयनेच केले असून अमिताभ बच्चन देखील यात दिसून येणार आहेत.
तर इंद्र कुमार यांच्या ‘थँक गॉड’मध्येही रकुल सामील आहे. या चित्रपटात ती अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत झळकणार आहे. रकुलनेच अलिकडेच जॅकी भगनानी याच्यासोबतच्या प्रेमसंबंधांची कबुली दिली आहे.