ऑनलाईन टीम / रायपुर :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे आज निधन झाले. त्यांचा मुलगा व माजी आमदार अमित जोगी यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
या पूर्वी 27 मे रोजी अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची परिस्थिती अधिक नाजूक असल्याकारणाने त्यांवेळी पासून ते व्हेंटिलेटरवर होते. अखेर, शुक्रवारी दुपारी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
अमित जोगी यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, आज फक्त मी नाही तर पूर्ण छत्तीसगड वासियांनी एक नेता नाही, तर एक पिता गमावला आहे. अजित जोगी आपल्या अडीच कोटी लोकांच्या परिवाराला सोडून निघून गेले आहेत. गावं- गरिबांचा सहारा, छत्तीसगडचा दुलारा आम्हाला सोडून खूप लांब गेला आहे. असं ही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
दरम्यान, नोकरी करून राजनेता बनलेले अजित जोगी हे छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री होते. ते नोव्हेंबर 2000 ते नोव्हेंबर 2003 पर्यंत त्यावेळच्या काँग्रेस सरकार मध्ये मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम करत जनता काँग्रेस छत्तीसगढ पार्टी बनवली. अगदी शेवट पर्यंत ते मारवाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत होते.