वृत्तसंस्था/ विजापूर
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी एक हल्ला केला आहे. आयईडी स्फोटाद्वारे घडवून आणलेल्या या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला तर एक जवान जखमी झाला आहे. कुटरू भागातील अम्बेली येथे नक्षलींनी हा स्फोट घडवून आणला आहे. आयईडी स्फोटाच्या तावडीत सापडल्याने हेड कॉन्स्टेबलला हौतात्म्य प्राप्त झाले आहे.
ही घटना राजधानी रायपूरपासून सुमारे 450 किलोमीटर अंतरावरील कुटरू पोलीस स्थानकाच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली आहे. रस्तेनिर्मितीच्या कार्याची पाहणी करण्यासाठी परिसरात सुरक्षा जवानांची एक मोहीम सुरू होती. कुटरूपासुन सुमारे 4 किलोमीटर अंतरावरील अम्बेली गावानजीक जंगलात गस्त पथक विश्रांतीसाठी थांबलेले असताना नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात हेड कॉन्स्टेबल कलेंद्र प्रसाद नायक यांना हौतात्म्य प्राप्त झाले आहे. तर कॉन्स्टेबल कमल ठाकूर हे जखमी झाले आहेत.