ऑनलाईन टीम / छत्तीसगड :
छत्तीसगडमधील सुकमा आणि विजापूर या नक्षलग्रस्त भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण आले. त्यामधील दोन जवानांचे पार्थिव सुरक्षा दलाच्या हाती आले आहे. दरम्यान, या चकमकीत जखमी झालेल्या 23 जवानांना विजापूरच्या तर 7 जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अद्याप 15 जवान बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास विजापूर जिल्ह्यातील तारेम येथे नक्षली आणि सीआरपीएफ जवानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत पाच जवानांना वीरमरण आले असून, 10 नक्षली ठार झाले. चकमकीनंतर जंगल भागातून मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलाच्या जवानांनी जप्त केला. त्यानंतर एटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा पथकाच्या 400 जवानांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली. या शोध मोहीमेदरम्यान नक्षलींनी जवानांच्या बसवर हल्ला केला होता.