प्रा. राहुल शिंगे यांचे प्रतिपादन : नंदगड येथे दुर्गा दौडीची सांगता
वार्ताहर /नंदगड
छत्रपती शिवाजी राजांना घडवण्यात राजमाता जिजाऊ बरोबरच शहाजीराजांचे ही तितकेच मोलाचे कार्य होते. शिवाजी राजांना घडवताना शहाजीराजांना अनेक अपमान सहन करावे लागले. परंतु हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी कदापि हार मानली नाही. आपल्या मुलाला राजा बनविण्यासाठी सदोदीत प्रयत्नशील राहिले. बारा बलुतेदार व मावळय़ांच्या मदतीने अनेक लढाया जिंकून स्वराज्य निर्माण करण्याचे आई-वडिलांचे ध्येय छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण करून दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सर्वांनी घ्यावा, असे प्रतिपादन इचलकरंजी येथील व्याख्याते प्रा. राहुल शिंगे यांनी व्यक्त केले. नंदगड येथील मसुरकर गल्लीत दुर्गादौडीचा सांगता समारंभ झाला.
यावेळी शिंगे म्हणाले, शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. महिलांना यथोचित सन्मान दिला. राज्य करताना शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन अतिउत्तम होते. त्यांच्या त्या वेळच्या व्यवस्थापनावर आजही देश-विदेशात अभ्यास केला जातो. म्हणूनच आज ही एक आदर्श राजा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे सांगितले. नंदगड गावात प्रतिवर्षाप्रमाणे घटस्थापनेपासूनच रोज पहाटे दुर्गा देवीचे आयोजन करण्यात येते. यावषी दुर्गादौड मोठय़ा उत्साहात काढण्यात आली. युवक-युवती या दुर्गादौडीत व नागरिक सहभागी झाले होते. शेवटच्या दिवशी मसूरकर गल्लीत दुर्गादौडीची सांगता करण्यात आली. मसूरकर गल्लीतील जनतेने व महिलांनी गल्लीच्या प्रवेशद्वारावर आरती ओवाळून दौडीचे उत्साही स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
करंबळ विभागीय दुर्गामाता दौडीची सांगता
घटस्थापना ते दसऱयापर्यंत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान करंबळ विभागातर्फे करंबळ, रुमेवाड़ी, जळगे, देवनगर, रुमेवाड़ी क्रॉस, होनकल, गंगवाळी कौंदल व शिंदोळी या गावांमध्ये श्री दुर्गामाता दौड पोहोचविण्यात आली. या दुर्गामाता दौडीची सांगता करंबळ गावांमध्ये करण्यात आली. प्रारंभी मराठी शाळा करंबळ येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांची पूजा व शस्त्रपूजन करून गावातील तरुण धारकरी अभिलाष कोडचवाडकर याच्या हस्ते ध्वजाची पूजा करण्यात आली.
ही दौड पंचायत रोड, धोंडदेव गल्ली, श्री दुर्गा देवी मंदिर, श्री चव्हाटा- होळी, श्री ब्रह्मदेव मंदिर, श्री जोतिबा मंदिर, श्री पंचमाई मंदिर, श्री कलमेश्वर मंदिर, श्री लक्ष्मी गदगा, श्री धोंडदेव देवस्थान, श्री हनुमान मंदिर, श्री जन्मीदेव, श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर, श्री सदर देवस्थान, आंबेडकर गल्लीमार्गे श्री महालक्ष्मी मंदिर येथे या दौडीची सांगता झाली. या दौडीमध्ये जळगे, देवनगर, कौंदल होनकल, गंगवाळी, रुमेवाडी, रुमेवाडी क्रॉस व शिंदोळी गावातील धारकरी शिवप्रेमी, गावकरी उपस्थित होते.