वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राजधानीतील छत्रसाल स्टेडियमवर मल्लांच्या कुस्ती प्रशिक्षणाला प्रारंभ झाला असून भारताचे अव्वल मल्ल रवि दाहिया आणि दीपक पुनिया यांनी आपली उपस्थिती दर्शविली. माजी मल्ल आणि कुस्ती प्रशिक्षक सतपाल सिंग यांनी सरावाचे व्हिडिओ चित्रण प्रसिद्ध केले आहे.
कोरोना महामारी संकटामुळे जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत देशातील सर्व क्रीडास्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. या ब्रेकनंतर छत्रसाल स्टेडियमवर मल्लांचा सराव पुन्हा सुरू झाला. त्यात सुमारे 30 मल्लांनी आपला सहभाग दर्शविला. 2021 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी रवि दाहिया (57 किलो) आणि दीपक पुनिया (86 किलो) हे यापूर्वीच पात्र ठरले आहेत. 2018 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारा मल्ल सुमीत मलिक या सरावात दाखल झाला आहे. सतपाल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या मल्लांनी बराच वेळ कुस्तीचा सराव केला. कझाकस्तानमध्ये 2019 साली झालेल्या विश्व कुस्ती स्पर्धेत दाहियाने 57 किलो वजन गटात कास्यपदक तर दीपक पुनियाने 86 किलो गटात रौप्यपदक मिळविल्याने हे दोन्ही मल्ल टोकियो ऑलिंपिकसाठी पात्र ठरले आहेत. राजधानीतील छत्रसाल स्टेडियमने आतापर्यंत भारताला अनेक महान मल्ल उपलब्ध करून दिले असून 2012 च्या ऑलिंपिक स्पर्धेत कास्यपदक मिळविणारा योगेश्वर दत्त आणि दोनवेळा ऑलिंपिक पदकविजेता सुशिलकुमार यांचा उल्लेख करावा लागेल.