धबधबे, हिरवाई घालतेय पर्यटकांना साद : निसर्गरम्य परिसरात दुर्मीळ पशु-पक्ष्यांचेही दर्शन
प्रतिनिधी /बेळगाव
धामणे (एस.) येथील वनक्षेत्रात सुरू केलेल्या टेकिंगला पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी नागरिकांची गर्दी वाढत आहे. वनखात्याने परवानगी दिल्याने पर्यटकांना जंगल सफारी करता येत आहे.
एखाद्या चित्रपटात किंवा मोबाईलमध्ये आपण जंगल पाहतो. मात्र, प्रत्यक्ष निसर्गरम्य जंगलाचा आनंद लुटता येत आहे. त्यामुळे पर्यटकांसह निसर्गाचा अभ्यास करणाऱया नागरिकांची पावले जंगलाकडे वळत आहेत. येथील वनक्षेत्रात विविध जैवविविधता याबरोबरच हत्ती, तरस, बिबटे, कोल्हे, मोर आदी वन्यप्राणी आहेत. त्यामुळे काही वेळेला वन्यप्राण्यांचे दर्शनही होत आहे.
वन्यप्रदेशात उंचावरून कोसळणारे धबधबे, हिरवाईने नटलेली झाडे, बारमाही वाहणारे नाले आणि येथील जैवविविधता पर्यटकांना भुरळ घालत आहेत. दरम्यान, वन्यप्रदेशात दोन, पाच आणि आठ किलोमीटर असे तीन टेकिंग उपलब्ध करण्यात आले आहेत. दरम्यान, पर्यटक आपल्या सुरक्षिततेबरोबर इच्छेनुसार टेकिंग करू शकतात. 14 जानेवारीपासून या टेकिंगला प्रारंभ झाला असून आता काही प्रमाणात कोरोना नियमात शिथिलता दिल्याने निसर्गाच्या सानिध्यात फिरणाऱया पर्यटकांची संख्या वाढली आहे.
टेकिंगदरम्यान उंचावरून कोसळणारे धबधबे, विविध जातीची हिरवाईने नटलेली झाडे, विविध पशु-पक्षी पाहता येत आहेत. याबरोबरच परिसरात असलेला तलाव आणि कालवादेखील पर्यटकांना साद घालत आहे. पर्यटकांच्या सोयीखातर गाईडची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय सकाळी 10 ते सायंकाळी 5 यावेळेत जंगल सफारी खुली असून 250 रुपये शुल्क आकारणी केली जात आहे.
आनंद लुटता यावा म्हणून : विजयकुमार सालीमठ (मुख्य वन संरक्षणाधिकारी)
पर्यटकांना प्रत्यक्ष जंगल पाहता यावे, याकरिता टेकिंगला परवानगी दिली आहे. याबरोबर विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. जंगलात जैवविविधता, हिरवाई आणि धबधब्यांचे दर्शन होते. त्यामुळे येत्या दिवसात वन्यप्रदेशात भटकंती करणाऱया नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.