प्रयागराजमध्ये 3 वर्षीय मुलीचा मृत्यू
वृत्तसंस्था/ प्रयागराज
पैशांअभावी प्रयागराजमध्ये 3 वर्षीय मुलीने जे झेलले, ते ऐकून अंग शहारून जाते. मुलीला पोटदुखीचा त्रास होता, कुटुंबाकडे उपचारासाठी पैसे नसल्याने रुग्णालयाने मुलीसोबत क्रूरपणा दाखविल्याने तिचा तडफडून मृत्यू झाला आहे. रुग्णालयाने मुलीच्या शस्त्रक्रियेनंतर टाके न घालता फाटलेल्या फोटासोबतच तिला बाहेर काढल्याचा आरोप आहे.
रुग्णालयाची असंवेदनशीलता समोर आल्यावर प्रशासनाकडून चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने प्रयागराज जिल्हाधिकाऱयांकडून 24 तासांच्या आत कारवाईचा अहवाल मागविला आहे. आयोगाने याचबरोबर संबंधित डॉक्टर तसेच रुग्णालयाच्या कर्मचाऱयांच्या विरोधात गुन्हा नोदंविण्याची सूचना केली आहे.
पोटदुखीवरील उपचारासाठी रुग्णालयात
3 वर्षीय खुशी मिश्राला पोटदुखीचा त्रास होत असल्याने तिच्या आईवडिलांनी उपचारासाठी प्रयागराज येथील रुग्णालयात दाखल केले. आतडय़ांमध्ये संसर्ग असल्याचे सांगत काही दिवसांनी मुलीच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण टाके घातलेल्या ठिकाणी संसर्ग झाला होता. 4-5 दिवसांनी त्याच जागेवर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलीच्या वडिलांकडून या शस्त्रक्रियेसाठी 1.5 लाख रुपये घेतल्यावरही रुग्णालय प्रशासनाने 5 लाख रुपयांची मागणी केली. रक्कम देता न आल्यावर रुग्णालय प्रशासनाने मुलीला फाटलेल्या पोटासहच बाहेर काढले. या स्थितीमुळे मुलीचा मृत्यू ओढवला आहे.
उपचारासाठी शेतजमिनीची विक्री
मुलीच्या उपचारासाठी तिच्या वडिलांनी शेतजमीन विकली होती. नातेवाईकांकडून उसनवारी करूनही मुलीला वाचविता आले नाही. तर रुग्णालयाने स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.