एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांनी सोमवारी उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. उपराष्ट्रपतीपदासाठी 6 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख 19 जुलै आहे. धनखड यांच्याविरोधात काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा या विरोधी पक्षाकडून उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार असतील. त्या मंगळवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार जगदीप धनखड यांनी नामांकनापूर्वी बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारून राष्ट्रपतींनी मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांच्याकडे बंगालचा कार्यभार सोपवला आहे.