गोवा फॉरवर्डला भगदाड
प्रतिनिधी /पणजी
सांत आंदेचे माजी सरपंच जगदीश भोबे यांनी मंगळवारी अचानक आपल्या समर्थकांसह गोवा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश करून गोवा फॉरवर्ड पक्षाला जोरदार हादरा दिला.
पणजी येथील पक्ष कार्यालयात झालेल्या सोहळ्यात लोकसभा खासदार आणि गोवा प्रभारी महुआ मोईत्रा आणि राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष लुइझिन फालेरो यांच्या उपस्थितीत भोबे यांनी टीएमसीमध्ये प्रवेश केला.
प्रवेश सोहळ्यानंतर बोलताना भोबे यांनी “आता भाजपला घरी पाठवण्याची वेळ आली आहे आणि आमची टीम त्याबद्दल खूप गंभीर आहे. ’टीएमसी’ने हे सिद्ध केले आहे, की भाजपला हुसकावून लावण्याची ताकद असणारा हा एकमेव पक्ष आहे. गोव्यातील लोकांचे कल्याणकारी योजनांद्वारे सक्षमीकरण करण्याच्या दिशेनेही त्यांनी तत्परता दाखवली आहे’, असे सांगितले.
काँग्रेसवर आणखी निशाणा साधताना त्यांनी काँग्रेसकडून ज्या प्रकारे भाजप कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात येत आहे, ते पाहता हे दोन्ही पक्ष एकमेकांशी हातमिळवणी करत असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपाचा 20 वर्षे कार्यकर्ता असलेला आज काँग्रेसचा उमेदवार आहे. यावरून या दोन्ही पक्षाची मिलीभगत स्पष्ट होत आहे, असे भोबे म्हणाले.
श्रीमती मोईत्रा यांनी बोलताना, भोबे यांच्या प्रवेशाने आम्हाला आनंद झाल्याचे सांगितले. त्यांच्यासोबत युवा अध्यक्ष आणि गटाध्यक्षांसह संपूर्ण टीम आमच्यात सामील झाली आहे. त्यांच्यासारख्या मजबूत नेत्यांनी पक्षात प्रवेश केल्याने ’टीएमसी’ आणखी मजबूत होईल, असे त्या म्हणाल्या.
भोबे यांचे पक्षात स्वागत करताना, फालेरो यांनी गोमंतकीयांचे जीवन अधिक चांगल्या प्रकारे बदलण्याच्या तुमच्या आकांक्षाना पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
गोवा ’टीएमसी’ मनापासून तरुण आणि गतिमान नेत्यांचे स्वागत करते आणि गोव्यात ‘नवी सकाळ’ सुरू करण्यासाठी त्यांच्या पूर्ण सहकार्याने काम करण्याची आशा करते, असेही फालेरो म्हणाले.