बेंगळूर : कोरोना परिस्थितीमुळे पर्यटकांविना शुकशुकाट असणाऱया जगप्रसिद्ध जोग फॉल्स परिसरात आता नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनलॉकची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे जोग फॉल्स पाहण्यासाठी पर्यटकांना सोमवारी परवानगी देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी येथे मोठी गर्दी दिसून आली.
दरवर्षी पावसाळा सुरू होताच शिमोगा जिल्हय़ातील जोग फॉल्स परिसर पर्यटकांनी गजबजून जातो. मात्र, यंदा कोरोना परिस्थितीमुळे पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली होती. राज्य सरकारच्या सूचनेवरून पर्यटन खात्याने जोग फॉल्स पर्यटकांसाठी खुला केला आहे. त्यामुळे मंगळवारपासून धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत धबधबा पाहण्यासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. पर्यटकांना मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्याची सूचना देण्यात आली आहे.