अमेरिकेत लोकांना मास्क परिधान करण्याचे आवाहन : न्यूयॉर्कमधील बळींचा आकडा 3 हजारावर
कोरोना विषाणूमुळे जगभरात आतापर्यंत 60147 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 1130591 वर पोहोचली आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे 2 लाख 35 हजार 891 जण संसर्गातून पूर्णपणे बरे झाले आहेत. ब्रिटनमध्ये मागील 24 तासांमध्ये 684 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशातील बळींचा आकडा 3605 वर पोहोचला असून एकूण रुग्णसंख्या 38168 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप आणि दोन परिचारिकांच्या मृत्यूनंतर ब्रिटनच्या सरकारने लोकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. ब्रिटनची महाराणी रविवारी संध्याकाळी देशवासीयांना संबोधित करणार आहे.
ब्रिटनचे नागरिक परतणार
फिलिपाईन्समध्ये अडकून पडलेल्या ब्रिटिश नागरिकांना 4 विमानांद्वारे मायदेशी परत पाठविले जाणार असल्याची माहिती ब्रिटनच्या दूतावासाने दिली आहे. तर लंडन येथील इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ ज्यूरिस्ट अँड बार असोसिएशनने संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषदेत चीनच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.
चीनमध्ये पाळले मौन
चीनमध्ये कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांसाठी शनिवारी 3 मिनिटांचे मौन राखण्यात आले. देशभरात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर आणला गेला होता. देशात या महामारीमुळे सुमारे 3 हजार 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रमाणवेळेनुसार 10 वाजता देशभरात मौन पाळण्यात आले आहे. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण डिसेंबर महिन्यात वुहान शहरात आढळून आला होता.
न्यूयॉर्कमध्ये लाखाहून अधिक रुग्ण
अमेरिकेत 24 तासांमध्ये सुमारे 1480 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 32 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत 7403 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत 277522 रुग्ण आढळून आले आहेत. न्यूयॉर्कमध्ये प्रत्येक अडीच मिनिटांनी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अध्यक्षीय निवडणूक होणारच
अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक निश्चित दिवशी म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे विधान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. परंतु कोरोनामुळे अनेक प्रांतांनी निवडणुकीला स्थगिती दिली आहे. तर डेमोक्रेटिक पार्टीने महामारीमुळे जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत होणाऱया नामांकन परिषदेला स्थगिती दिली आहे.
संसर्गामागे चीन : ऑस्ट्रेलिया
कोरोना संसर्गामागे चीनमधील मांसबाजार असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी केला. मांसबाजाराच्या विरोधात जागतिक आरोग्य संघटना तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. चीनचा हा मांसबाजार जगातील अन्य देशांसाठी गंभीर धोका आहे. डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा उगम वुहानमधील मांसबाजारातूनच झाल्याचे मानले जाते.
पाकिस्तानात उपाययोजना
प्रवासावर बंदी घालण्यात आल्याने अत्यावश्यक सामग्रीच्या पुरवठय़ावर भर दिला जाणार असल्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 2708 रुग्ण आढळून आले आहेत. पंजाब प्रांतात सर्वाधिक 1069 रुग्ण सापडले आहेत. सिंध प्रांतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
ब्राझीलमध्ये निष्काळजीपणा अंगलट
दक्षिण अमेरिकेतील देश ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 1146 नवे रुग्ण सापडले आहेत. तर देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून 9216 झाली आहे. देशात आतापर्यंत 365 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे कार्यकारी सचिव जोआओ गबार्डो यांनी दिली आहे. ब्राझीलमध्ये सलग तिसऱया दिवशी कोरोनाचे एक हजार नवे रुग्ण समोर आले आहेत.
इटलीत 766 नवे बळी
इटलीत दिवसभरात 766 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सिव्हिल प्रोटेक्शन एजेन्सीने दिली आहे. एकूण बळींची संख्या 14681 वर पोहोचली आहे. इटलीत चालू महिन्यात संसर्गाच्या आकडय़ांमध्ये घट झाली आहे. 1 एप्रिल रोजी 4782, दोन रोजी 4 हजार 668 आणि 3 रोजी 4 हजार 585 रुग्ण आढळून आले आहेत.
आफ्रिका : 50 देशांमध्ये कोरोना
आफ्रिका खंडात कोरोना विषाणूमुळे 284 जणांचा मृत्यू झाला असून 7028 रुग्ण आढळले आहेत. आफ्रिका सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने विषाणू 50 आफ्रिकन देशांमध्ये फैलावल्याची माहिती दिली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचे 1496, अल्जीरियात 847 आणि इजिप्तमध्ये 779 रुग्ण आढळून आले आहेत.
स्पेनमध्ये बेरोजगारी वाढली
स्पेनमध्ये शुक्रवारी 850 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 7 हजारांपेक्षा अधिक नवे बाधित समोर आले आहेत. देशात आतापर्यंत 11744 जणांचा मृत्यू झाला असून 119827 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना संकटामुळे स्पेनमध्ये 9 लाखांपेक्षा अधिक जणांना बेरोजगार व्हावे लागले आहे. पर्यटन उद्योग पूर्णपणे ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.
हज यात्रा रद्द होणार?
कोरोना संकटामुळे हज यात्रा 222 वर्षांनी रद्द करण्याचा निर्णय सौदी अरेबिया घेऊ शकते. यापूर्वी 1798 मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता. मागील वर्षी हज यात्रेवर सुमारे 20 लाख भाविक पोहोचले होते. यात्रा रद्द झाल्यास सौदी अरेबियाला मोठे नुकसान होणार असून कच्च्या तेलाचे दर आधीच कोसळले आहेत. सौदी अरेबियात 2 हजार 39 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
इराकमध्ये 820 रुग्ण
इराकमध्ये 820 रुग्ण आढळून आले असून 54 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इराकच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. महामारी रोखण्यासाठी चीनच्या 7 तज्ञांचे पथक 7 मार्चपासून इराकच्या वैद्यकीय तज्ञांसोबत काम करत आहे.