रेस्टॉरंटमध्ये बसूनच खावा लागणार
दुबईत ‘ओ पाव’ नाव असलेल्या रेस्टॉरंटने सोन्याचा (गोल्ड प्लेटेड) वडापाव तयार केला आहे. हा वडापाव खरेदी करण्यासाठी 99 दिरहम (सुमारे 2 हजार रुपये) खर्च करावे लागणार आहेत. तसेच हा वडापाव केवळ रेस्टॉरंटमध्येच खाता येतो, बाहेर नेण्याची अनुमती नाही. हे रेस्टॉरंट दीर्घकाळापासून विविध प्रकारचे वडापाव तयार करत आहे. भारतीय खाद्यपदार्थांसाठी हे रेस्टॉरंट दुबईत लोकप्रिय आहे.
जगातील पहिला 22 कॅरेट गोल्ड वडापाव सादर करतानाचा भारतीय रेस्टॉरंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा वडापाव चीज आणि प्रेंच ट्रफल बटरने भरलेला असेल. ब्रेड म्हणजेच पावाला होममेड मिंट मेयोनेज डिपसोबत मांडले जाणार असल्याचे रेस्टॉरंटकडून सांगण्यात आले. वडापाव लाकडी पेटीतून ग्राहकांसमोर सादर केला जाणार आहे. डिश अधिक आकर्षक दिसावी म्हणून बॉक्समध्ये नायट्रोजनचा वापर करण्यात आला आहे. याचबरोबर स्वीट पोटॅटो फ्राय आणि मिंट लेमोनेड देखील देण्यात येत आहे. पण दुबईत खाद्यपदार्थांसोबत सोन्याचा वापर करण्याचा प्रकार बऱयाच काळापासून सुरू आहे. तेथे 24 कॅरेट सोन्याचा बर्गर, आइस्क्रीम, प्रेंच टोस्ट आणि बिर्याणी देखील तयार करण्यात आली आहे.