लंडन आयपेक्षा उंचीने असणार दुप्पट
दुबई जगभरात स्वतःच्या आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे. बुर्ज खलिफा आणि डीप डाइव्ह दुबईनंतर संयुक्त अरब अमिरातच्या या सर्वात मोठय़ा शहरात आता जगातील सर्वात मोठे आणि सर्वात उंच ऑब्जर्व्हेशन व्हील खुले होणार आहे. 21 ऑक्टोबर रोजी ते लोकांसाठी खुले होईल. ऑब्जर्व्हेशन व्हिल 38 मिनिटांमध्ये एक फेरी आणि सुमारे 76 मिनिटांमध्ये दोन फेऱया मारणार आहे.
लंडन आयच्या उंचीपेक्षा सुमारे दुप्पट उंचीचे ऑब्जर्व्हेशन व्हील लोकांना 250 मीटरच्या उंचीपर्यंत नेणार असून तेथून दुबईच्या मोहक दृश्याचा आनंद घेता येणार आहे. हे व्हील दुबईच्या ब्ल्यूवॉटर्स बेटावर आहे.
ऐन दुबईमध्ये आकाशात भोजन करण्याच्या सुविधेसह लोकांना 19 प्रकारचे विशेष पॅकेजही मिळतील. यांतर्गत वाढदिवस, साखरपुडा, विवाह आणि व्यावसायिक कार्यांसाठी पॅकेज उपलब्ध होतील. याचबरोब रात स्वतंत्र केबिनचीही सुविधा देण्यात आली आहे.
ऐन दुबई ऑव्ब्जर्व्हेशन व्हील दुबईकडून विकसित अनेक नव्या पुढाकारांपैकी एक आहे. ऑब्जर्व्हेशन व्हीलला संयुक्त अरब अमिरातच्या 50 व्या वर्षांदरम्यान खुले केले जाणार असल्याची माहिती दुबई होल्डिंग एंटरटेनमेंटचे मुख्य संचालन अधिकारी मोहम्मद शराफ यांनी दिली आहे.
अलिकडेच दुबईने जगातील सर्वाधिक खोलीचा स्वीमिंग पूल तयार केला आहे. डीप डाइव्ह दुबई नाद अल शेबा भागात तयार करण्यात आला आहे. याची खोली विक्रमी 60 मीटर इतकी आहे. यात 1 कोटी 40 लाख लिटर पाणी सामावते.