ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
जगातील सर्वात प्रभावशाली 100 व्यक्तींमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश झाला आहे. अमेरिकेतील टाइम मॅगझिनने दरवर्षीप्रमाणे 100 प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई, अभिनेता आयुष्मान खुराणा, एचआयव्हीवर संशोधन करणारे रविंदर गुप्ता आणि शाहीन बाग परिसरातील आंदोलनात सामिल असलेल्या बिल्किस यांचा समावेश आहे.
टाइम मॅगझिनने यंदा प्रसिद्ध केलेल्या यादीत पंतप्रधान मोदी हे एकमेव भारतीय नेते आहेत. याशिवाय चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग, तैवानच्या राष्ट्राध्यक्ष त्साई इंग वेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कमला हॅरिस, जो बायडेन, जर्मन चान्सलर एन्जेला मार्केल यांसारख्या अनेक नेत्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आले आहे.