23 महिन्यांच्या रानी गायीची उंची केवळ 51 सेंमी, वजन 28 किलोग्रॅम
तिला पाहण्यासाठी लॉकडाउनमध्येही लोकांची गर्दी
बांगलादेशात सध्या एक गाय चर्चेचा विषय ठरली आहे. ही जगातील सर्वात बुटकी गाय आहे. 23 महिन्यांच्या या गायीची उंची केवळ 51 सेंटीमीटर (20 इंच) आहे. तर वजन 28 किलोग्रॅम आहे. या गायीला रानी नाव देण्यात आले आहे. बांगलादेशात लॉकडाउन असूनही सुमारे 15 हजारांहून अधिक लोक या गायीला पाहण्यासाठी पोहोचले.
गायीचे मालक हसन हॉलादर असून त्यांचे फार्म हाउस बांगलादेशची राजधानी ढाक्यानजीकच्या चारीग्राम येथे आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात बुटकी गाय म्हणून रानीचे नाव नोंदविण्यासाठी अर्ज केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जगातील सर्वात बुटकी गाय म्हणून माणिक्यमचे नाव नोंद आहे. ही गाय केरळमधील आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डनुसार 2014 मध्ये माणिक्यम गायीची उ&च 24 इंच मोजण्यात आली होती. रानीला जगातील सर्वात कमी उंचीच्या गायीचा दर्जा देण्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी घेण्यात आल्याचे हॉलादर यांनी सांगितले आहे.
रानी गाय पाहण्यास येणारे लोकही चकीत होत आहेत. हॉलादर प्रसारमाध्यम प्रतिनिधी आणि लोकांना रानीची उंची मोजून दाखवत आहेत. अनेकदा तिचे वजनही केले गेले आहे लोक रानीसोबत छायाचित्रे काढून घेत आहेत.
रानीला चालण्यास त्रास होतो, तसेच ती अन्य गायींना घाबरत असल्याने तिला त्यांच्यापासून वेगळे ठेवण्यात आले आहे. रानीला हिंडणे आवडते, गोंजारल्यावर तिला आनंद होत असल्याचे हॉलादर यांनी म्हटले आहे.