माउना लोआमुळे वैज्ञानिक टेन्शनमध्ये
वृत्तसंस्था/ हवाई
प्रशांत महासागराच्या हवाई बेटसमुहातील मोठय़ा बेटावर असलेल जगातील सर्वात विशाल ज्वालामुखी माउना लोआ आता लाव्हारस ओकू लागला आहे. अमेरिकेचे वैज्ञानिक सातत्याने त्याच्यावर नजर ठेवून आहेत. हा विशाल ज्वालामुखी लवकरच पूर्णपणे सक्रीय होऊ शकतो असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
मागील आठवडय़ात हवाईच्या ज्वालामुखी निरीक्षण केंद्राने कमी तीव्रतेचे 200 भूकंपाचे धक्के नोंद केले होते. रिश्टर स्केलवर या भूकंपांच्या धक्क्यांची तीव्रता 2.5 पेक्षा कमी होती. बहुतांश भूकंप शिखराच्या सुमारे 6 किलोमीर खोलवर झाले होते. पण यामुळे ज्वालामुखीवर प्रभाव पडलेला नाही.
आकारात बदलाचा दर किंवा पद्धतीत कुठलेच परिवर्तन घडलेले नाही. ज्वालामुखीची सक्रीयता वाढू लागल्यावर त्याच्या आकारात बदल होणे सुरू होते. सध्या ज्वालामुखीचा विस्फोट होणार नसला तरीही तेथे स्थायिक लोकांनी स्थलांतराची तयारी सुरू केली आहे. माउना लोआमध्ये पूर्ण विस्फोट झाला तर याचा लावा काही तासातच स्थानिक वस्त्यांमध्ये पोहोचू शकतो. तर निम्म्या क्षमतेचा विस्फोट झाल्यास याचा धोका राहणार नाही. हवाई बेटावर एकूण 5 ज्वालामुखी सक्रीय आहेत. यातील एक अतिसक्रीय किलायुइए देखील आहे.