ऑनलाईन टीम / काशी :
जगात सर्वात वयोवृद्ध म्हणून प्रसिध्द असलेले काशीमधील शिवानंद बाबा यांनी बुधवारी कोरोनाची पहिली लस टोचून घेतली. शिवानंद बाबा यांनी दुर्गाकुंड येथील यूपीएचसीमध्ये कोरोनाचा पाहिला डोस घेतला आहे. शिवानंद बाबा यांच्या आधारकार्ड आणि पासपोर्टवरील माहितीनुसार बाबांचे वय 125 वर्षे इतके आहे.
भेलापुर भागातील कबीर नगर कॉलनीमधील स्वामी शिवानंद आश्रमात वास्तव्यास असलेल्या बाबा शिवानंद हे वयाच्या 125 व्या वर्षी देखील कार्यरत आहेत. ते आज देखील पहाटे तीन वाजता उठून काही तास योगा करतात. त्यानंतर त्यांचा दिवस सुरु होतो. ते नेहमीच साधे भोजन करतात. अजूनही त्यांची प्रकृती ठीक असून त्यांना एकही आजार नाही आहे.
- अभिनेत्री शिल्पा शेट्टीसाठी शिवानंद बाबा प्रेरणास्थानी
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपले आरोग्य, योगायामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. शिल्पा शेट्टी आपले आरोग्य, जीवनशैली आणि सकारात्मक जीवनासाठी शिवानंद बाबा यांना आपल्या प्रेरणास्थान मानते. शिल्पा शेट्टीने ही बाब स्वतःच्या ट्विटरवर शिवानंद बाबा यांचा व्हिडिओ शेअर करत सांगितली होती.
तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, किती प्रसन्न आणि सकारात्मक व्यक्ती आहेत, शिवानंद बाबा. ते आपल्या सुंदर जीवनामुळे आमच्यासाठी आदर्श आहेत. ते सुखी जीवनासाठी एक चांगला मंत्र सांगतात. ते सांगतात चांगले विचार आणि सदकर्म, लालसा विरहित आणि समर्पित जीवन यामुळे आपण ईश्वराला मिळवू शकतो आणि त्यामुळे आपले जीवन सुंदर आणि आनंदी बनेल.