ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉक डाऊन केले आहे, तरी देखील संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जगातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21 लाख 80 हजार 471 वर पोहचली आहे. तर 1 लाख 43 हजार 308 लोकांनी आपला जीव गमावला आहे. यातील 65 टक्के मृत्यू हे एकट्या युरोपमधील आहेत.
युरोपमध्ये मृतांची संख्या 90 हजार 180 आहे. जगातील 21 लाख 45 हजार 512 मधील दहा लाख 47 हजार 279 कोरोनाबाधित हे युरोप मधील आहेत.
यातच दिलासा देणारी बाब म्हणजे 5 लाख 43 हजार 280 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. बाकीच्या रुग्णांवर उपचार सुरू असून 57 हजार 267 जणांची प्रकृती गंभीर आहे.
अधिक माहिती नुसार, अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चोवीस तासात 2600 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकट्या अमेरिकेत मृतांचा आकडा 25000 च्या वर पोहोचला आहे. तर सहा लाख 39 हजार 664 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. 50 हजार 160 लोक बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
स्पेनमध्ये काल एका दिवसात 151 लोकांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 18 हजार च्या वर पोहोचली आहे. तर कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 85 हजार 309 झाली आहे.
दक्षिण कोरिया मध्ये गेल्या चोवीस तासात 22 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकुण आकडा 10 हजार 613 वर पोहोचला आहे. तर आत्तापर्यंत 229 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
इटलीमध्ये 21 हजार 645 बळी गेले असून कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 65 हजार 155 लोकांना संसर्ग झाला आहे.
फ्रान्समध्ये कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 47 हजार 883 असून 17 हजार 167 लोकांनी आपला जीव गमावला आहे.