प्रतिनिधी / जत
जत – देवनाळ रोडवरील बिज्जरगी मळ्याजवळ दुचाकी व टेम्पोच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. विश्वनाथ सिध्दाप्पा कोटी (वय ५०, विजापूर रोड, कोटी मळा, जत) असे मृत व्यक्तीचे नाव असून शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली. याबाबत जत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोटी हे देवनाळहून (एम. एच. १० डीएफ ०८३७) ही दुचाकी जतकडे निघाली होती. तर टेम्पो (एम एच १०के ६१९६) ही चारचाकी गाडी देवनाळच्या दिशेने निघाली होती. दरम्यान, बिज्जरगी मळ्याजवळ रस्त्याचा अंदाज न आल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात विश्वनाथ कोटी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची जत पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलिस नाईक बजरंग थोरात हे करत आहेत.