जत / प्रतिनिधी
घराच्या दारात वारंवार शेळ्या येतात या कारणावरून वडिलांनी मुलास रागवल्यानंतर संतापलेल्या मुलाने वडिलांना जबर मारहाण करून जखमी केले. यात गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. केशव तात्या जाधव वय 70 असे मयत वडीलाचे नाव असून कृष्णा केशव जाधव वय 45 असे संशयित आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी कृष्णा जाधव यास अटक केली आहे.
अधिक माहिती असे जत शहरापासून वळसंग रोडवर तंगडी वस्ती असून या वस्तीवर राहणाऱ्या केशव जाधव व त्यांचा मुलगा कृष्णा जाधव यांच्यात शेळ्या एकमेकांच्या दारात येण्याच्या कारणावरून मंगळवारी सायंकाळी वाद झाला होता. या कारणावरून वडिलांनी त्यास रागावल्याने राग अनावर झालेल्या मुलाने केशव जाधव यांना काठीने जबर मारहाण केली. या मारहाणीत केशव जाधव यांच्या छातीला, डोक्याला, पायाला, पाठीवर गंभीर मार लागला होता. जखमी झालेल्या जाधव यांना शेजारील लोक व नातेवाईक यांनी तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. परंतु त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी पहाटे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसात मयत जाधव यांची पत्नी हीराबाई केशव जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जगताप करत आहेत.