जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील कोंत्येबोबलाद येथील चौघांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. शिवाजी भिवा करे (वय ३२), मारुती लिंबाजी सरगर (वय३२), पांडुरंग शंकर लोखंडे (वय३६), श्रीशैल सैदाप्पा कांबळे (वय ४६, सर्व रा.कोंत्येबोबलाद, ता. जत) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी पांडुरंग लोखंडे हा संशयित फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. याबातचे दोषारोप पत्र पोलिसांकडून न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. या कारवाईने संघटीत गुन्हेगारीला आळा बसणार आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोंत्येबोबलाद येथील एका व्यक्तीला काही महिन्यापूर्वी आर्थिक वादातून कर्नाटकात नेऊन जबर मारहाण केली होती. या घटनेनंतर उमदी पोलिसात काही संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याअनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू होता. या दरम्यान संशयित शिवाजी करे, मारुती सरगर, पांडुरंग लोखंडे, श्रीशैल कांबळे यांच्याविरोधात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडे, मारामारी, चोरी, बेकायदेशीर जमाव जमवणे, दहशत माजवणे यासारखे दोन पेक्षा संघटित प्रकारचे अधिक गुन्हे दाखल होते. गुन्ह्याची तीव्रतामुळे ही गुन्हेगारी रोखण्यासाठी संशयित चौघा आरोपीवर मोका प्रस्ताव सादर करणे बाबतच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाने उमदी व जत उपविभागीय पोलिस कार्यालयास देण्यात आल्या होत्या.
त्यानुसार याबाबतचे सर्व पुरावे तपास अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे सादर केले होते. या बाबतची गांभीर्यता लक्षात घेऊन महासंचालकांनी मोका लावण्यास मंजुरी देण्यात आली होती याबाबतचे दोषारोप पत्र नुकतेच जत न्यायालयात सादर करण्यात आले आहे. याकामी उमदी पोलिसांनी देखील महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.