नागरिक झाले भयभीत
जत प्रतिनिधी
जत तालुक्यातील डफळापुरपासुन चार कि.मी.अंतरावरती असलेल्या कुडणुर गावांमध्ये दुसऱ्यांदा हँडग्रेनेड बॉंब आढळल्याने नागरिक भयभीत झाले. हा बॉम्ब दिसताच बॉंब..बॉंब ..करीत नागरिकांची एकच खळबळ उडाली.
दरम्यान, याच गावात बॉम्ब सापडण्याची ही दुसरी वेळ असुन पाच वर्षांपूर्वीही येथे बॉंबसदृष्य वस्तु आढळुन आली होती. शनिवारी ही घटना उघकीस येताच या बाबतची माहिती कुडणुरचे पोलीस पाटील मंजुषा मनोहर कदम यांनी जत पोलीसाना तातडीने माहिती दिली. जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी मोठ्या पोलीस फौजफाटा सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी सांगलीहुन बॉंबविरोधी पथक, श्वानपथक बोलावून घेतले.
कुडणुर येथील जि.प. शाळेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या इयत्ता सहावीचा वर्ग येथील सदाशिव व्हनमाने यांच्या गावात असणा-या कौलारु घरात भरवण्यात आला आहे. आज शनिवार असल्याने सकाळच्या सत्रात शाळा भरली होती. शाळा सुटल्यावर काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांच्याकडील बॉल आतल्या खोलीत पडल्याने तो आणण्यासाठी काही मुले गेली असता त्यांना बॉंबसदृष्य वस्तु आढळुन आली. मात्र मुलांना याबाबतची कोणतीही कल्पना नव्हती. त्यानंतर उपस्थित काही मंडळीच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना माहिती दिली आणि ही बाब गावचे पोलीस पाटील यांच्या कानावर घातली. तद्नंतर सदरची घटना जत पोलीसात कळविण्यात आली. घटनास्थळी जतचे डीवायएसपी रत्नाकर नवले, जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे त्यांचा पोलीस फौजफाटा, श्वानपथक, बॉंबविरोधी पथक दाखल झाले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलिसांनी हा बॉम्ब कोणी व कुठून आणला याचा तपास सुरू केला आहे. तसेच याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. हा बॉम्ब जिवंत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यावर अरबी अक्षरात माहिती आहे. यावेळी लिओ श्वान चौकशीसाठी कुडणुरात दाखल होता.
कुडनुर गावात यापूर्वी म्हणजे पाच वर्षां पूर्वी एकदा असाच हॅंडग्रेनेड सापडला होता. या गावात मोठ्या प्रमाणात सैन्य दलात लोक आहेत. त्यामुळे तेथून कुणी हा बॉम्ब आणला का याचाही तपास करण्यात येत आहे