प्रतिनिधी / जत
जत शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून चार चाकी गाडीत ठेवलेली तब्बल तीन लाख 70 हजाराची बॅग अज्ञात चोरट्यांनी दिवसा ढवळ्या लांबवली. ही घटना सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास घडली. या प्रकाराने जत बाझार पेठेत एकच खळबळ उडाली. शिवाय हा प्रकार सीसीटीव्ही. कॅमेरात कैद झाला आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत.
तालुक्यातील सिध्दनाथ येथील शेतकरी संभाजी लकाप्पा चौगुले यांनी सोमवारी द्राक्षबाग व डाळींब बागेचे जमा झालेले पैसे काढण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र येथे आले होते. शहरातील उमराणी रोडवरील बँकेतून पैसे काढून झाल्यानंतर त्यांनी ही रक्कम बॅग मध्ये घालून ती बॅग त्यांनी आणलेल्या फोर्ड कंपनीच्या चारचाकी गाडीतीलसीट वर ठेवली होती.
दरम्यान, त्यांच्या चार चाकी गाडीतील हवा कमी झाल्याचे दिसताच ते हवा भरण्यासाठी थांबले. त्याचवेळी एका अज्ञात पांढरा शर्ट घातलेल्या व तोंडाला मास्क घातलेल्या चोरट्याने गाडीजवळ येऊन दरवाजा खोलून आत प्रवेश करत मागील सीटवर ठेवलेल्या पिशवीतील रोख रक्कम ३ लाख ७० हजार रुपये घेऊन पळत सुटला. हा प्रकार चौगुले यांच्या लक्षात येताच, त्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला, तोवर पाठीमागून त्याचा दुसरा साथीदार दुचाकीवर येऊन त्याला घेऊन गेला. त्यामुळे चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. यामुळे शेतकरी हतबल झाला.तसेच हा सारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असले तरी अंधुक व धूसर दिसत असल्याने आरोपींची ओळख पटली नाही. याबाबत जत पोलीस ठाण्यात चौगुले यांनी फिर्याद दिली असून आधिक तपास जत पोलिस निरीक्षक करीत आहेत.