जत / प्रतिनिधी
जत संस्थानच्या राजमाता श्रीमंत किर्तिमालिनिराजे डफळे वय १०० वर्षे यांचे बुधवारी रात्री राहते बंगल्यामध्ये वृध्दापकाळाने निधन झाले. राजमाता श्रीमंत किर्तीमालीनीराजे डफळे यांच्या निधनामुळे डफळे राजघराण्याचे छत्र हरपले असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या या निधनामुळे जत शहरासह तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, गुरुवारी सकाळी जत येथील छत्रीबाग येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या निधनामुळे जत तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
श्रीमंत किर्तीमालीनीराजे डफळे या मनमिळाऊ होत्या. त्यानी जत येथे महिलांसाठी जिजामाता महिला मंडळाची स्थापना केली होती.या महिला मंडळाचे माध्यमातून त्यानी अनेक महिलांना एकत्र आणण्याचे काम केले होते.
जत संस्थानच्या त्या राजमाता होत्या जत संस्थानचे नरेश कै.श्रीमंत विजयसिंहराजे डफळे यांच्या त्या भावजय होत्या.त्या कुडाळ येथिल शिंदे राजघराण्यातील असून त्यांचा विवाह जत संस्थानचे संस्थानिक श्रीमंत अजितसिंहराजे डफळे यांच्याशी झाला होता. त्यांचे पती श्रीमंत अजितसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज हे सैन्यदलातील नोकरी सोडून ते मुंबई पोलीसात दाखल झाले होते.मुंबई पोलीस दलात ते उच्चपदावर कार्यरत होते.वरिष्ठ अधिकारी, जतचे संस्थानिक म्हणून त्यांचे अनेक बड्या हस्तींसी ॠनानुबंध होते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना जत संस्थानात घेऊन येण्यात व त्यांची शाहीलवाजमासह मिरवणूक काढून त्यांचा आदर सत्कार करण्यात भाऊसाहेब महाराज व मासाहेब यांचा मोठा वाटा होता. जत संस्थानचे संस्थानिक श्रीमंत रामराव ऊर्फ अनिलराजे डफळे व राजकन्या श्रीमंत मंगलाराजे ही त्यांची अपत्य होत,
दरम्यान, श्रीमंत किर्तीमालीनीराजे डफळे यांच्यावर आज गुरूवारी डफळे राजघराणेचे अंत्यसंस्कार करण्याचे ठिकाण छत्रीबाग या ठिकाणी धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी फुलानी सजविलेल्या कारमधून श्रीमंत किर्ती मालीनीराजे डफळे यांची जत शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली.
श्रीमंत किर्तीमालीनीराजे डफळे यांचे नातू व श्री. यल्लमा देवी प्रतिष्ठान जत चे अध्यक्ष श्रीमंत शार्दुलराजे डफळे यांनी त्यांच्या पार्थिवास भडाग्नी दिला.
यावेळी जत संस्थानचे संस्थानिक श्रीमंत. बाबाराजे डफळे, डफळे कुटुंबातील सदस्य, आ विक्रमदादा सावंत, जलसंपदामंत्री ना.जयंतरावजी पाटील साहेब यांचे स्वीय सचिव श्री. अमोल डफळे, राजे रामराव महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. शिवाजीराव बिसले, अशोक पाटील, प्रा.चंद्रसेन मानेपाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रत्नाकर नवले, राष्ट्रीय काँग्रेस चे कार्याध्यक्ष नाना शिंदे,युवराज निकम, शहाजीबापू भोसले, तुकाराम माळी, प्रभाकर जाधव, दिपक शिंदे, अरूण शिंदे, गणेश सावंत, जतचे पोलीस पाटील मदन पाटील, तसेच विविध संस्थाचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शुक्रवार दि.११ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता रक्षा विसर्जन कार्यक्रम छत्रीबाग या ठिकाणी करण्यात येणार आहे.