प्रतिनिधी / मडगाव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी मडगावच्या दक्षिण गोवा भाजप कार्यालयात भेट देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपच्या कार्यालयात मुख्यमंत्र्यांतर्फे आपल्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी मडगाव, फातोर्डा व इतर भागातील लोकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. ऐन पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला.
यावेळी प्रसार माध्यमांना आपल्या भेटीची माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, राज्यातील जनतेच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्या यासाठी त्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांच्या समस्या जाणून घेत आहोत. तसेच राज्यातील प्रत्येक नागरिकाला मला भेटण्यासाठी पणजीमध्ये येण्यास त्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज आम्ही जे काही करतो ते जनतेच्या हितासाठी करत असून तेव्हा जनतेनेही आम्हाला सहकार्य करण्याची गरज आहे.
देशभरात महागाई वाढत आहे. महागाई कमी करण्यासाठी आमच्यापरीने होत असलेले प्रयत्न आपण करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सागर माला प्रकल्पासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, सागरमाला प्रकल्पा संदर्भात विरोध सद्या लोकांची दिशाभूल करीत आहेत. सागरमाला प्रकल्प हा कोळसा वाहतुकीसाठी नाही. मात्र, पर्यटनाचा विकास व गोव्यातील मच्छीमार व्यवसाय यासाठी त्याचा वापर करण्याचा सरकारचा हेतू आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नंतर फातोर्डा मतदारसंघातून पालिका निवडणुकीत उतरणाऱया भाजप समर्थक उमेदवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आगामी पालिका निवडणूक भाजप तर्फे प्रतिष्ठेची बनविण्याचे संकेत देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.