मनसे कुडाळ तालुका अध्यक्षांचे आवाहन
प्रतिनिधी / कुडाळ:
जनतेने आपल्या परिसरात बेकायदा दारु विक्री, जुगार, मटका, गांजा व ड्रग्ज विक्री आदी अवैध धंदे होत असल्यास मनसेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून सविस्तर माहिती कळवावी, असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केले आहे. अशी माहिती देणाऱया नागरिकांची नावे गुप्त ठेवण्यात येतील, असे आवाहन मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले आहे.
जिल्हय़ात सर्वत्र जुगार, मटका, गांजा व ड्रग्ज विक्री आणि गावठीसह गोवा बनावटीची दारु विक्री आदी अवैध धंदे कोरोना संचारबंदी कालावधीपासून फोफावू लागत असल्याने जिल्हय़ात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढू लागल्याचे चित्र आहे. अशा अनैतिक धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आटोकाट प्रयत्न करतात. मात्र, अपुऱया कर्मचारी बळामुळे या अवैध धंद्यांचे मुळासकट उच्चाटन होण्यास मर्यादा येत आहे. शिवाय काही भ्रष्ट कर्मचारी अशा धंदेवाल्यांना अर्थपूर्ण संबंधातून पाठिशी घालत असल्याने त्यांची दहशत निर्माण होऊन काही ठिकाणी माफियाराज बोकाळल्याची परिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळते. आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन अक्षरशः बरबाद होत आहे. अशा अनेक पालकांच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त होऊ लागल्या आहेत.
अवैध धंद्यांच्या विरोधात मैदानात
मनसे याबाबत आक्रमक असून अवैध धंद्यांच्या विरोधात मैदानात उतरली आहे. पोलिसांना या मोहिमेत सहकार्य म्हणून बेकायदा धंद्यांची ठिकाणे, ते चालविणारे आदींबाबत माहिती पुरवून कठोर कारवाईसाठी आग्रही राहणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरणार आहे. देशाची भावी पिढी व्यसनांच्या आहारी जाऊन निष्क्रीय बनू नये यासाठी मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हय़ातील मनसेचे कार्यकर्ते तत्पर आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.