रक्कम काढण्यासाठी पाळावे लागतील नियम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
महिला लाभार्थ्यांच्या जनधन खात्यामध्ये 500 रुपये प्रतिमहिन्याचा दुसरा हप्ता 4 मे रोजी जमा करण्यात येणार आहेत. याची माहिती खातेधारकांना त्यांच्या अधिकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. तसेच त्यांना ही रक्कम काढण्यासाठी नियम पाळावे लागतील, असे केंद्र सरकारने एका निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
रक्कम काढताना बँकांमध्ये गर्दी होऊ नये याकरता एटीएमचाही वापर करता येणार आहे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या 500 रुपये मदतीची घोषणा 26 मार्च रोजी करण्यात आली होती. पुढील तीन महिन्यांसाठी म्हणजे एप्रिलपासून प्रतीमहिना 500 रुपये महिला खातेधारकांना दिले जाणार आहेत. रक्कम काढण्यासाठी त्यांना खाते क्रमांकानुसार तारखा वाटून दिल्या जाणार आहेत. त्यानुसारच पैसे काढता येतील, असे या निवेदनात म्हटले आहे.