ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून, तेथील प्रख्यात फॉक्स न्यूज चॅनेलने केलेल्या जनमत चाचणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन आघाडीवर असल्याचे दिसून आले.
राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाच्या वतीने ज्यो बिडेन रिंगणात आहेत. फॉक्स न्यूज चॅनेलने केलेल्या जनमत चाचणीत बिडेन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चांगलीच आघाडी घेतल्याचे दिसून आले. बिडेन हे ट्रम्प यांच्या पेक्षा 12 पॉईंटने आघाडीवर आहेत.
फॉक्स न्यूजने 13 ते 16 जून या अवधीत घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत 50 टक्के मतदारांनी बिडेन यांच्या बाजूने आपला कौल दिला तर 36 टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या बाजूने आपला कौल दिला आहे.
ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमुळे अमेरिकेतील लोक नाराज आहेत. त्यातच कोरोनामुळे वाढलेली मृतांची संख्या, बेरोजगारी आणि जॉर्ज फ्लॉईड या आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय नागरिकाच्या हत्येनंतरचे हिंसक आंदोलन यामुळे राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ट्रम्प यांच्यासाठी सोपी राहिली नाही. अमेरिकेतील नागरिकांमध्ये ट्रम्प यांच्याविषयी असंतोष वाढत असल्याने ट्रम्प यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.