बेंगळूर
जनरल के. एस. तिम्मय्या यांच्या सैनिकी गाथा दाखविणाऱया ‘जनरल तिम्मय्या वस्तू संग्रहालया’चे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रपतींनी संग्रहालय आवारातील जनरल तिम्मय्या यांच्या स्मारकावर पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले. कोडगू येथील जनरल के. एस. तिम्मय्या यांचे जन्मस्थळ असलेले ‘सन्निसाईड’चे वस्तू संग्रहालयामध्ये परिवर्तन करण्यात आले आहे. जनरल तिम्मय्या यांच्या सैनिकी जीवनातील घटना, भारतीय सेनादलाचे महत्त्व आणि युद्धातील स्मारके, जनरल तिम्मय्या यांचे सैनिकी गणवेश, लहानपणी आपल्या आजोबांसमवेत सन्निसाइड येथे झोपण्यासाठी वापरण्यात येत असलेले त्यांचे अंथरुण, मिनी रॉकेट लाँचर, युद्धावेळी वापरलेल्या बंदुका या वस्तू संग्रहालयात पाहावयास मिळणार आहेत. यावेळी प्रथम महिला सविता कोविंद, सीडीएस बिपिन रावत, कोडगू जिल्हा पालकमंत्री व्ही. सोमण्णा, मंत्री अरविंद लिंबावळी, आमदार अप्पच्चू रंजन, के. जी. बोप्पय्या यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.