10 जूनपासून कार्यवाही : ‘विस्टाडोम’सह अत्याधुनिक एलएचबी कोचही जोडणार
कणकवली:
कोकण रेल्वे मार्गावर दादर ते मडगाव अशी धावणारी, कोकणवासीयांसाठी जिव्हाळय़ाची वाटणारी जनशताब्दी स्पेशल गाडी (01151 / 01152) यापुढे सीएसएमटी ते मडगाव अशी धावणार आहे. तसेच गाडीला अत्याधुनिक मानली जाणारी एलएचबी कोचची सुविधा करण्यात आली आहे. हा नवा बदल 10 जूनपासून लागू होणार आहे.
कोकणवासियांना नेहमीच आपलीशी वाटणारी जनशताब्दी एक्सप्रेस ही कोरोना कालावधीदरम्यानच्या ‘लॉकडाऊन’मध्ये बंद झाली. पुढे ‘लॉकडाऊन’च्या नियम शिथिलतेनंतर ही गाडी जनशताब्दी विशेष म्हणून धावू लागली. येत्या 10 जूनपासून कोकण रेल्वेचे मान्सून वेळापत्रक सुरु होत आहे. त्या दिवसापासूनच या गाडीमध्ये एलएचबी कोच, नवीन स्टेशन असे बदल करण्यात आले आहेत.
ही गाडी आता दादर ऐवजी सीएसएमटी येथून सुटणार असल्याने गाडी सुटण्याच्या वेळेतही बदल झाला आहे. यापूर्वी दादर रेल्वेस्थानक येथून सकाळी 5.20 वा. सुटणारी ही दादर – मडगाव (01151) गाडी आता सीएसएमटी येथून सकाळी 5.10 वा. सुटेल व 5.18 वा. दादर येथे पोहोचेल. तर मडगाव – दादर (01152) ही गाडी रात्री 11.08 वा. दादर व 11.30 वा. सीएसएमटी येथे पोहोचेल. त्याव्यतिरिक्त ‘अप’ व ‘डाऊन’ या दोन्ही गाडय़ांच्या अन्य स्थानकांवरील वेळा पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.
16 एलएचबी कोच
यापूर्वीच कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस या गाडय़ांमध्ये आधुनिक पद्धतीच्या एलएचबी कोचची सुविधा करण्यात आली आहे. तशीच सुविधा आता जनशताब्दीमध्येही करण्यात आली असून तब्बल 16 एलएचबी बोगी जोडण्यात आल्या आहेत. त्याव्यतिरिक्त खास आकर्षण असलेला विस्टाडोम कोचही असणार आहे. साहजिकच प्रवाशांसाठीही ही पर्वणी ठरणार आहे. हा नवा बदल प्रवाशांनाही भावेल, असा विश्वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.