काणकोण मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे संकेत
प्रतिनिधी /काणकोण
काणकोणातील काँग्रेसची उमेदवारी युवा नेतृत्व जनार्दन भंडारी यांना जाहीर झाल्यानंतर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. काँग्रेस श्रेष्ठींनी नवा चेहरा व युवा नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा दिलेला शब्द पाळला. यापुढील जबाबदारी मात्र काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. काणकोण मतदारसंघातून परत एकदा पक्षाच्या उमेदवाराला जिंकून आणण्याचे काम पक्ष कार्यकर्त्यांना करावे लागणार असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यंदाची निवडणूक पूर्णपणे युवकांच्या हातात असून खऱया अर्थाने काँग्रेसने युवा नेतृत्वाला उभारी दिली आहे, अशा प्रतिक्रिया भंडारी यांच्या समर्थकांनी व्यक्त केल्या.
जनार्दन भंडारी यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काणकोण मतदारसंघातील एकंदर राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत मिळायला लागले आहेत. काल-परवापर्यंत उमेदवारीची शाश्वती व्यक्त करणारे आणि घरोघरी जाऊन प्रचार करणारे महादेव देसाई व परिवर्तन यात्रा करून नव्या चेहऱयाची मागणी करणारे गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक यांची नेमकी भूमिका काय असेल यावर पुढील राजकारण बरेच अवलंबून आहे.
भाजपाच्या उमेदवारीवर डोळा असलेले रमेश तवडकर आणि इजिदोर फर्नांडिस यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार आहे. त्यातील तवडकर यांना जर उमेदवारी मिळाली, तर फर्नांडिस अपक्ष म्हणून लढणार आहेत. मात्र इजिदोरना उमेदवारी मिळाली, तर तवडकर काय करतील हे अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे विजय पै खोत, रमेश तवडकर, इजिदोर फर्नांडिस यांच्यासहित जनार्दन भंडारी, अनुप कुडतरकर, प्रशांत पागी मिळून सध्या तरी सहा उमेदवार रिंगणात असतील असा अंदाज आहे.
भंडारी यांच्या काँग्रेसच्या उमेदवारीमुळे या मतदारसंघातील काँग्रेसच्या मतांचे ध्रुवीकरण जसे होणार आहे त्याचप्रमाणे पै खोत, तवडकर किंवा फर्नांडिस आणि कुडतरकर व पागी यामुळे भाजपाची मते विभागणार आहेत. सध्या भाजपाला असलेल्या विरोधाचा त्याचबरोबर तवडकर आणि फर्नांडिस नको म्हणणाऱया गटाचा फायदा भंडारी घेणार की पै खोत हे नजीकच्या काळात दिसून येणार आहे. यामुळे यंदाची काणकोणची निवडणूक बरीच रंगतदार होण्याचे संकेत मिळत आहेत.