अपघातात 3 म्हैशींचा जागीच मृत्यू; 8 म्हैशी जखमी : टोळक्याचा स्थानिकांना चिरडण्याचा प्रयत्न
वार्ताहर / केळघर
केळघर घाटात गुरुवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मुकवली मुरा येथे जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो उलटला असून या अपघातात 3 म्हैशींचा जागीच मृत्यू झाला असून 8 म्हैशी जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर 20 ते 25 जणांच्या टोळक्याने स्थानिकांवर हल्ला चढवून वाहनाने चिरडण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांनी चांगलाच प्रतिकार केल्यावर टोळक्याने तिथून पोबारा केला.
सातारा – महाबळेश्वर-मेढा दरम्यान असलेल्या केळघर घाटात मुकवली मुऱहा, ता. जावळी याठिकाणी जनावरांची अवैध वाहतूक करणारा टेम्पो क्र. एम. एच.04 जी. एफ.6386महाड कडून साताऱयाकडे जात असताना पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने रेंगडी गावाजवळ एका वळणावर उलटला. या टेम्पोत एकूण 11 म्हशी होत्या. अपघात झाल्यानंतर यातील 3 म्हशींचा मृत्यू झाला तर 8 म्हशी जखमी झाल्या आहेत. स्थानिकांना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱया 20-25 जणांच्या टोळक्याने स्थानिकांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. तसेच बरोबर आणलेल्या वाहनांद्वारे चिरडण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे मुकवली मुऱहा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी ग्रामस्थांनी टेम्पोमध्ये पाहिले असता 3 म्हैशींचा जागेवरच मृत्यू झाला होता, तर अपघातामुळे रस्त्यावर फेकल्या गेलेल्या 8 म्हैशी गंभीर जखमी झाल्या होत्या. जखमी म्हैशींच्या हंबरडय़ामुळे घटनास्थळावर अतिशय विदारक चित्र निर्माण झाले होते. रात्री टेम्पो पलटी झाल्यानंतर चालक तसेच इतर लोक घटनास्थळावरुन पळून गेले होते. मात्र, गुरुवारी सकाळी पुन्हा ते 20-25 लोकांना घेवून घटनास्थळी पोहोचले. उलटलेला टेम्पो त्यांनी सरळ करुन रस्त्याच्या बाजूला लावला. यावेळी स्थानिकांनी हा काय प्रकार सुरु आहे, ही जनावरांची तस्करी तर नाही ना? असे अनेक प्रश्न विचारले असता त्या टोळक्याने स्थानिकांवर शस्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतू स्थानिकांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यामुळे त्या टोळक्याने घटनास्थळावरुन पोबारा केला. यावेळी त्यांनी बरोबर आणलेल्या वाहनांद्वारे स्थानिकांना चिरडण्याचाही प्रयत्न केला. यानंतर स्थानिकांनी याबाबतची माहिती मेढा पोलीस ठाण्याला कळविली. मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी घटनास्थळी दुपारी भेट देऊन जखमी म्हशींवर उपचार करून त्या वेळे येथील गोशाळेत सोडणार असल्याचे सांगितले. टेम्पो चालक रशीद अली शेख (वय 40) रा. मुलुंड गोवंडी याच्यावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे करत आहेत.