बेळगाव ग्रामीण पोलिसांची कारवाई, 10 जनावरे घेतली ताब्यात : पोलीस तपास सुरू
प्रतिनिधी / बेळगाव
चोऱया, घरफोडय़ा करणाऱया चोरटय़ांची संख्या कमी नाही. यातील अनेक जण पोलिसांच्या जाळय़ात अडकले आहेत. मात्र बेळगाव ग्रामीण पोलिसांनी चक्क जनावरे चोरणाऱया दोघा चोरटय़ांना अटक करुन त्यांच्याकडील तब्बल 10 जनावरे ताब्यात घेतली आहेत. सुरेश पाटील (वय 32) आणि गणेश नायक (वय 27, दोघेही रा. हंगरगा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
या चोरटय़ांनी ग्रामीण भागातील शेतकऱयांच्या गायी व म्हशी चोरल्या. पाच म्हशी तर पाच गायी त्यांनी चोरल्या होत्या. यामध्ये दोन गायी गीर गायी आहेत. तर तीन मुरा जातीच्या आहेत. चोरलेली जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या जनावरांची किंमत 9 लाख असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
यामधील सुरेश पाटील याने पशुवैद्यकीय पदवी घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. चोरण्यात आलेल्या गायी व म्हशींकडून ते दूधाचे उत्पादन घेत होते. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील जनावरांच्या चोरीच्या प्रकारामध्ये वाढ झाली होती. अनेकांनी याबाबत फिर्यादी नोंदविल्या होत्या. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनीलकुमार यांनी या सर्व प्रकरणाचा शोध लावला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलीस निरीक्षक सुनीलकुमार यांनी गेल्या आठवडय़ात बेळगाव-गोवा रोडवर चालत्या वाहनांतील साहित्य चोरणाऱया टोळीला अटक केली होती. त्यानंतर आता जनावरे चोरणाऱया या दोघांना अटक केली आहे.