प्रतिनिधी / बेळगाव
शाळा प्रवेश प्रक्रिया ऊंबरठय़ावर असल्याने कागदपत्रे जमविण्याची तयारी पालकांनी चालविली आहे. त्यामुळे जन्म दाखल्यासाठी महापालिकेकडे नागरिक धाव घेत आहेत. मात्र जन्म-मृत्यू दाखला विभागातील सर्व्हर डाऊन असल्याने दाखले मिळणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे नागरिकांना धावपळ करावी लागत आहे.
महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखला विभागातील सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्याने दाखला देण्याची प्रक्रिया ठप्प होत आहे. मागील चार दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाली असून, जन्म-मृत्यू दाखले वितरणात अडचण निर्माण झाली आहे. सध्या काही शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याकरिता जन्म दाखला आवश्यक आहे. जन्म दाखल्यासाठी पालक महापालिका कार्यालयाकडे धाव घेत आहेत. तसेच जन्म दाखल्यातील दुरुस्तीकरिता मनपाकडे अर्ज केले आहेत. मात्र सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण झाल्याने वेळेत दाखले मिळणे कठीण बनले आहे. तसेच मृत्यू दाखला घेण्यासाठीदेखील नागरिक येत असतात. पण कोणताच दाखला मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ऑनलाईन दाखले देण्यासाठी सर्व्हर व्यवस्थित असणे आवश्यक आहे. पण महापालिकेच्या जन्म-मृत्यू दाखला विभागाचे सर्व्हर सातत्याने डाऊन होत आहे.
चार दिवसांपासून काम ठप्प
चार दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्याने दाखले वितरणाचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. दाखले घेण्यासाठी नागरिक आले असता सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात आल्यानंतर नागरिक मनपा कर्मचाऱयांबरोबर वाद घालत आहेत. त्यामुळे महापालिकेचे जन्म मृत्यू कक्षात दररोज भांडणाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे जन्म मृत्यू दाखला विभागातील सर्व्हर डाऊनची समस्या दूर करावी, अशी मागणी होत आहे.