सामाजिक अंतर राखण्याचे नागरिकांना आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
शहरात कोरोनाचा प्रसार वाढल्याने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे जन्म-मृत्यू दाखले वितरणाची सुविधादेखील महापालिकेने बंद ठेवली होती. मात्र लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने सामाजिक अंतर राखण्याच्या अटीवर जन्म-मृत्यू दाखले वितरणाचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे दाखले वितरणाचे काम थांबविण्यात आले होते. तसेच महापालिकेच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना कोरोना नियंत्रणासाठी काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यामुळे दाखले वितरणाचे काम तब्बल दीड महिना थांबले होते. दि. 4 मे पासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. पण प्रलंबित अर्ज निकालात काढण्याचे काम मागील 15 दिवसांपासून करण्यात आले. तसेच जन्म-मृत्यू नोंदीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर शनिवारपासून जन्म-मृत्यू दाखले वितरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र गर्दी टाळण्यासाठी दिवसाला 50 नागरिकांना दाखले देण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. तसेच अर्ज देताना व दाखले घेताना सामाजिक अंतर राखणे, तोंडाला मास्क घालणे बंधनकारक आहे.