वृत्तसंस्था/ टोकियो
जपानचा पुरूष जिम्नॅस्ट कोहेइ युचीमुरा याला कोरोनाची बाधा झाल्याचे सांगण्यात आले. पुढीलवर्षी होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील जिम्नॅस्टिक स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या अगोदर सर्व जिमनॅस्टची कोरोना चांचणी घेण्यात आली. त्यामध्ये युचीमुरा पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
ही आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट स्पर्धा आणखी दहा दिवसांच्या अंतराने सुरू होणार आहे. जपानचा अव्वल जिम्नॅस्ट युचीमुराने यापूर्वी तीनवेळा ऑलिंपिक सुवर्णपदक पटकाविले आहे. आता कोरोना समस्येमुळे 8 नोव्हेंबरपासून खेळविल्या जाणाऱया या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेतून युचीमुराने माघार घेतल्याचे स्पर्धा आयोजकांनी सांगितले. या स्पर्धेत चीन, रशिया, अमेरिका, यजमान जपानचे जिम्नॅस्ट सहभागी होत आहेत.