वृत्तसंस्था/ पुणे
एएफसी आशिया चषक महिलांच्या फुटबॉल स्पर्धेला येथे प्रारंभ झाला असून बलाढय़ जपानने पहिल्या सामन्यात म्यानमारचा 5-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला. जपान या स्पर्धेतील विद्यमान विजेता आहे. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंडोनेशियाचा 18-0 असा दणदणीत पराभव केला. कर्णधार सॅम केरने हॅट्ट्रिकसह पाच गोल नोंदवले. या स्पर्धेतील ही पहिली हॅट्ट्रिक आहे.
शुक्रवारच्या जपान संघाला खाते उघडण्यासाठी 22 मिनिटांचा कालावधी लागला. क गटातील हा सामना येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेळविण्यात आला. 22 व्या मिनिटाला रिको युकीने जपानचे खाते उघडले. सामन्याच्या उत्तरार्धात युई हॅसेगेवा आणि हिकारू नोमोटा यांनी प्रत्येकी 1 गोल करून जपानची आघाडी वाढविली. बदली खेळाडू नेरुमियाने जपानचा चौथा गोल केला. दुखापतीच्या कालावधीत हॅसेगेवाने जपानचा पाचवा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून म्यानमारचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. म्यानमारच्या खेळाडूंना शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. जपानच्या महिला संघाने यापूर्वी दोन वेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविले आहे. सोमवारी जपानचा क गटातील दुसरा सामना व्हिएतनामबरोबर होणार आहे तर म्यानमारचा पुढील सामना कोरियाबरोबर होईल.