मनोरंजन क्षेत्रात कार्यरत कंपनी : स्थानिक भाषांमध्ये सेवा देण्यासाठी उत्सुक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जपानची एंटरटेनमेंट कंपनी म्हणून ओळख असणारी अकात्सुकी लवकरच भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत आहेत. कंपनी स्थानिक दिग्गज व्हीडीओ स्ट्रिमिंग कंपन्या आणि केबल टेलीव्हीजन सेवा यांच्यासोबत तडजोड करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे.
कंपनीने मागच्या वर्षाअखेर भारतीय बाजारात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली होती. मोबाईल गेम ड्रगन बॉल जेडसाठी प्रसिद्ध म्हणून कंपनीची चांगली ओळख राखली असल्याचे फोर्ब्सच्या अहवालामधून सांगितले आहे. प्रारंभीच्या काळात नेटफ्लिक्स, ऍमेझॉन प्राईम व्हीडीओ, डिजनी प्लस, हॉटस्टार आणि युटय़ूबयासारख्या व्हीडीओ ऑन डिमांड सेवांसोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.
कंपनी प्रथम जपानी ओरिजन्लसला भारतीय भाषांमध्ये डब करणार आहे जी चालू वर्षाच्या शेवटी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्याची तयारी सुरू आहे. प्रमुख इंग्रजी आणि हिंदी भाषांच्या ऐवजी अन्य स्थानिक भाषांमध्येही यांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये मराठी, तेलगु, आणि बंगाली भाषेत निर्मिती करण्यासाठीची योजना सुरु असल्याचे म्हटले आहे.
जपानच्या तुलनेत भारतात अधिक पसंती
भारतापेक्षा जपानची लोकसंख्या तुलनेत कमी आहे. यामुळे भारतात या मनोरंजन कंपनीला मोठय़ा प्रमाणात लहान मुलांच्या स्वरुपात प्रेक्षक मिळण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. भारतासह कंपनीची आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची तयारी असल्याचेही म्हटले जात आहे.