युएई ठरला मंगळावर यान पाठवणारा पहिला मुस्लीम देश
दुबई / वृत्तसंस्था
संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने सोमवारी जपानच्या मदतीने मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. ‘होप मार्स मिशन’अंतर्गत मंगळाचा अभ्यास करण्यासाठी ही झेप घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जपानमधील तानेगाशिमा येथील प्रक्षेपण केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आल्यामुळेच युएई हा मंगळावर यान सोडणारा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.
स्थानिक वेळेनुसार सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी यान प्रक्षेपित करण्यात आले. हे यान पुढील सात महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात मंगळाच्या दिशेने प्रवास करेल. त्यानंतर 2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करुन तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करणार आहे. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतिक असल्याचे युएईने म्हटले आहे. 1.3 टन वजनाचे हे यान 50 कोटी किमीचे अंतर पार करणार आहे. मंगळ मोहीम प्रक्षेपण यशस्वी ठरल्याची माहिती युएईच्या अंतराळ संशोधन संस्थेनेच दिली आहे.