एएफसी आशियाई चषकसाठी पात्र
नोंदवताना./ वृत्तसंस्था
सुईता, जपान
स्ट्रायकर अदो ओनैवूने पूर्वार्धात नोंदवलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर जपानने 2022 विश्वचषक आशियाई पात्रता फेरीतील लढतीत किर्गीझ प्रजासत्ताकवर 5-1 अशी मात केली.
आठवडय़ापूर्वी जपानने ताजिकिस्तानला 4-1 असे हरविले होते. त्या संघातील पाच खेळाडूंना प्रशिक्षक हाजिमे मोरियासू यांनी या सामन्यात बदलले आणि ताकुमी मिनामिनोच्या गैरहजेरीत ओनैवूला आघाडीवर ठेवले. ओनैवूने प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरविताना 27 व्या मिनिटाला पेनल्टीवर जपानला आघाडी मिळवून दिली. ऐझर अकमातोव्हने चेंडू हाताळल्यामुळे जपानला ही पेनल्टी मिळाली होती. चार मिनिटानंतर कावाबे हायावने निर्माण केलेल्या संधीवर त्याने दुसरा गोल नोंदवला आणि 33 व्या मिनिटाला जबरदस्त हेडरवर गोल नोंदवून केवळ 6 मिनिटांत हॅट्ट्रिक पूर्ण केली. उत्तरार्धात ताकुमा असानो व शो सासाकी यांनी त्यात आणखी दोन गोलांची भर घातली. किर्गीझचा कर्णधार मिर्लान मुर्झाएव्हने पूर्वार्धातील स्टॉपेज टाईममध्ये पेनल्टीवर किर्गीझचा एकमेव गोल नोंदवला.
गट फेरीतील जपानच्या सातही साखळी सामन्यात मिनामिनोने गोल नोंदवले असून गेल्या गुरुवारी सर्बियाविरुद्ध झालेल्या लढतीनंतर तो प्रिमियर लीग संघ लिव्हरपूलकडे गेला होता. या सामन्यात जपानने 1-0 असा विजय मिळवित पात्रता मिळविली होती. ट्रान्फरच्या कारणास्तव तो संघाबाहेर राहिल्याने या सामन्यात खेळू शकला नाही. ओनैवूने नोंदवलेली हॅट्ट्रिक ही विश्वचषक स्पर्धेतील जलद वेळेत नेंदवलेली नाही. 2001 मध्ये इजिप्तच्या अब्दुल हमिद बासौनीने केवळ 117 सेकंदात हॅट्ट्रिक नोंदवली होती. त्यावेळी त्यांनी नामिबियावर 8-2 असा विजय मिळविला होता. जपानने चीनमध्ये होणाऱया 2023 एएफसी आशियाई चषक स्पर्धेतील तसेच 2022 कतार विश्वचषक स्पर्धेतील स्थानही निश्चित केले आहे. त्यांनी आठ सामन्यात 8 विजय मिळविताना 46 गोल्स नोंदवले आणि प्रतिस्पर्ध्यांना फक्त 2 गोल दिले. अन्य सामन्यात ताजिकिस्तानने म्यानमारचा 4-0 असा पराभव करीत फ गटात दुसरे स्थान मिळविले.