प्रतिनिधी/ मडगांव
जपानमध्ये खोल समुद्रात ‘डायमंड प्रिन्सेस’ या जहाजावर 124 भारतीय खलाशी अडकले होते. त्यात 50 गोमंतकीयांचा समावेश आहेत. या खलाशांना इंडियन एअरलाईन्स खास विमानाने भारतात आणले जात असल्याची माहिती अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे.
या 124 खलाशांपैकी 14 जणांना कोरोना वायरसची बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्यांना कोरोना वायरसची बाधा झाली, त्यांना दिल्ली विमानतळावर आणल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. किमान पुढील 20 ते 25 दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. नंतरच त्यांना आपल्या राज्यात जाऊ दिले जाणार असल्याची माहिती ऍड. सावईकर यांनी दिली आहे.
डायमंड प्रिन्सेस या जहाजावर भारतीय खलाशी अडकले असून त्यात 50 गोमंतकीय असल्याची माहिती मिळताच अनिवासी भारतीय आयुक्त ऍड. नरेंद्र सावईकर यांनी केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर तसेच जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशात पाठविण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नाना यश आले असून काल बुधवारी खास विमानाने हे खलाशी मायदेशी निघाले आहेत.
ऍड. सावईकर यांनी या खलाशांना मायदेशी आणण्यात पूर्ण सहकार्य केल्याने केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर व जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांचे आभार मानले आहेत.