एक महिन्यातील आकडेवारी : विकसित देशातील गंभीर समस्या
वृत्तसंस्था/ टोकियो
अत्यंत विकसित देश असलेल्या जपानमध्ये वर्षभरात कोरोना महामारीने घेतलेल्या बळींपेक्षाही अधिक जणांनी एक महिन्यात आत्महत्या केली आहे. जपानमध्ये कोरोनामुळे 2,087 जण दगावले आहेत. तर केवळ ऑक्टोबर महिन्यातच 2,153 जणांनी स्वतःचे जीवन संपविले आहे.
जपानची लोकसंख्या 10 कोटींच्या आसपास आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 42 हजार कोरोनाबाधित सापडले आहेत. कोरोनामुळे जपानमध्ये अनेकांच्या आयुष्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. अनेकजण तणावाखाली असून नोकरीवर गडांतर, वेतनकपात, आर्थिक समस्यांमुळे यात अधिकच भर पडली आहे. कोरोना महामारीमुळे मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असा इशारा तज्ञांनी दिला होता. आत्महत्या प्रकरणांचा डाटा जाहीर करणाऱया काही मोजक्या देशांमध्ये जपानचा अंतर्भाव होतो. अमेरिकेनेही 2018 नंतर आत्महत्येसंबंधीचा विदा जाहीर केलेला नाही. जपानच्या आकडेवारीवरून अन्य देशांमधील स्थितीचा अंदाज लावला जाऊ शकतो, असे तज्ञांनी म्हटले आहे.
जपानमध्ये कोरोनाकाळात टाळेबंदीही लागू करण्यात आलेली नाही. अन्य देशांच्या तुलनेत जपानमध्ये कोरोनाचा प्रभावही कमी आहे. अशी स्थिती असतानाही देशात आत्महत्येच्या घटना वाढत आहेत. याचमुळे इतर कोरोनाग्रस्त देशांमध्ये ही संख्या अधिकच असू शकते, असे उद्गार टोकियो विद्यापीठाचे प्राध्यापक मिशिको उए यांनी काढले आहेत.
जपानमध्ये आत्महत्या करणाऱयांचे प्रमाण अधिक आहे. 2016 साली आत्महत्येमुळे होणाऱया मृत्यूंची संख्या दर एक लाख नागरिकांमागे 18.5 इतकी होती. दक्षिण कोरियानंतरचा आकडा सर्वाधिक होता. तर जागतिक पातळीवर आत्महत्या करणाऱयांचे प्रमाण एक लाख नागरिकांमागे 10.6 इतके होते.
जपानमध्ये मागील वर्षी 20 हजार जणांनी आत्महत्या केली होती. तर मागील वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात महिलांच्या आत्महत्येचे प्रमाण 83 टक्क्यांनी वाढले आहे. तर पुरुषांमधील आत्महत्येचे प्रमाण 22 टक्क्यांनी वाढले आहे. कोरोना महामारीमुळे महिलांवर अधिक परिणाम झाला असण्याची शक्यता या आकडेवारीतून व्यक्त होत आहे.