वृत्तसंस्था/ टोकियो
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पुरूषांच्या फुटबॉलमध्ये यजमान जपान, स्पेन, ब्राझील आणि मेक्सिको संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
शनिवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात यजमान जपानने न्यूझीलंडचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत शेवटच्या चार संघांत स्थान मिळविले. दुसऱया एका सामन्यात स्पेनने आयव्हरी कोस्टवर जादा कालावधीत निर्णायक गोल करून विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. जपान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना निर्धारित वेळेत तसेच त्यानंतरच्या जादा 30 मिनिटांच्या कालावधीत गोलशून्य बरोबरीत होता. पण त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये न्यूझीलंडच्या कॅकेसीचा पेनल्टीवरील फटका जपानचा गोलरक्षक तानीने रोखला. त्याचप्रमाणे न्यूझीलंडच्या लेवीसचा फटका गोलपोस्टच्या दांडीला आदळून बाहेर गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये कर्णधार मेया योशिदाच्या जपान संघाने 4 गोल नोंदवून न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले. 2012 च्या लंडन ऑलिंपिकनंतर प्रथमच जपानने या क्रीडा प्रकारात उपांत्य फेरी गाठली. 1968 च्या ऑलिंपिक स्पर्धेत जपानने पुरूषांच्या फुटबॉलमध्ये कास्यपदक मिळविले होते. जपान आणि स्पेन यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
शनिवारी झालेल्या अन्य एका सामन्यात स्पेनने आयव्हरी कोस्टचा 5-2 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. विद्यमान विजेत्या ब्ा्राझीलने इजिप्तचा 1-0 असा पराभव करत उपांत्य फेरीचे आपले स्थान निश्चित केले. ब्राझील संघातर्फे एकमेव गोल मॅथ्यूज कुन्हाने नोंदविला. 2012 मध्ये सुवर्ण जिंकणाऱय़ा मेक्सिकोविरुद्ध ब्राझीलची उपांत्य लढत होणार आहे. शनिवारच्या अन्य एका सामन्यात मेक्सिकोने दक्षिण कोरियाचा 6-3 असा दणदणीत पराभव करत शेवटच्या चार संघात स्थान मिळविले. मेक्सिकोतर्फे सेबॅस्टियन कोर्डोव्हा आणि हेन्री मार्टिन यांनी प्रत्येकी दोन गोल तर ऍग्युरी आणि रोमो यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला.