पोलीस वनविभागाची कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
जमखंडी (जि. बागकोट) जवळ शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दुतोंडी साप विकणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. बेळगाव येथील पोलीस वनविभागाच्या पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली असून एक दुतोंडी साप जप्त करण्यात आला आहे.
गोपिनाथ उर्फ पिंटू हणमंत कावळे (वय 22, रा. जमगी, ता. जमखंडी) असे त्याचे नाव आहे. अमावस्यादिनी दुतोंडी साप विकण्याच्या प्रयत्नात असताना पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील, हवालदार आर. बी. यरनाळ, के. डी. हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.
गोपिनाथजवळून एक साप व एक मोटार सायकल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेला दुतोंडी साप पोलिसांनी जमखंडी येथील वनविभागाच्या अधिकाऱयांकडे सोपविला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कासव, घुबड, साप जप्त करण्याचा सपाटा सुरु केला आहे.