वार्ताहर/ जमखंडी
जमखंडी परिसरात कॅसिनोप्रमाणे ऑनलाईन जुगार सुरू असलेल्या तीन केंद्रांवर धाड टाकून एकूण 33 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 39 हजार 240 हजाराची रोख रक्कम, 40 संगणक, 34 मोबाईल, 19 सीपीयु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. येथील सदानंद कॉलनी, मैगूर रोड, उमारामेश्वर रोड येथील जुगार अड्डय़ावर पोलिसांनी धाड घालून ही कारवाई केली.
जमखंडी परिसरात कॅसिनोप्रमाणे जुगार सुरू संगणक पडद्यावर चक्र फिरवून ज्या अंकावर चक्राचा काटा थांबतो, त्याला कोणी पैसे लावले असतील त्याला दुप्पट रक्कम देण्यात येत होती. अन्य अंकावर लावण्यात आलेली रक्कम केंद्र चालकाला मिळत होती. अशा जुगारी खेळाकडे युवा वर्ग आकर्षिला जात होता. दरम्यान, जमखंडी पोलिसांना कॅसिनोप्रमाणे सदानंद कॉलनी, मैगूर रोड, उमारामेश्वर रोड येथे जुगार सुरू असल्याची खबऱयाकडून मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीसप्रमुख लोकेश जगलासर यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम सीपीआय विजय मुरगुंडी, पीएसआय एच. डी. जमखंडी, के. टी. शोभा यांच्या नेतृत्त्वाखाली नियोजनबद्ध सापळा रचून सदर तिन्ही ठिकाणी एकाचवेळी धाड टाकली.
धाड टाकल्यानंतर येथे उपस्थित असणाऱयांनी एकच पळापळ करण्यास सुरू केली. मात्र पोलिसांनी सर्व पळवाट आधीच बंद केल्याने बहुतांश जणांना बाहेर पडता आले नाही. याप्रकरणी 33 जणांना अटक करण्यात आली असून 39 हजार 240 हजाराची रोख रक्कम, 40 संगणक, 34 मोबाईल, 19 सीपीयु असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.