क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
स्ट्रायकर रॉय कृष्णाने सामन्याच्या 85 व्या मिनिटाला केलेल्या गोलामुळे एटीके मोहन बागानने जमशेदपूर एफसीचा पराभव करून आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आपल्या अकराव्या विजयाची नोंद केली.
या विजयाने एटीके मोहन बागानला तीन गुण प्राप्त झाले. या विजयाने 34 गुणांनी पहिल्या स्थानावर राहिलेल्या मुंबई सिटी एफसीला आता एटीकेने दुसऱया स्थानावर आणले आहे. एटीके मोहन बागानचे आता 17 सामन्यांतून अकरा विजय, तीन बरोबरी आणि तीन पराभवाने 36 गुण झाले असून ते आता पहिल्या स्थानावर आहेत. एटीकेने मात्र दुसऱया स्थानावर असलेल्या मुंबई सिटीपेक्षा एक सामना जास्त खेळला आहे. आता नॉर्थईस्ट युनायटेडचे 26 तर एफसी गोवाचे 24 गुण झाले आहेत.
एटीके मोहन बागानला विजयासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. त्यांच्या डेविड विलियम्स आणि रॉय कृष्णाने वेळोवेळी जमशेदपूरच्या बॉक्समध्ये प्रवेश मिळविला. मात्र जमशेदपूरच्या भक्कम बचावामुळे या दोघांनाही मुक्त खेळ करता आला नाही. सामन्याच्या सातव्या मिनिटाला डेविड विलियम्सच्या पासवर रॉय कृष्णाचा गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला.
पंधराव्या मिनिटाला एटीके मोहन बागानला गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली होती. यावेळी प्रीतम कोटालने दिलेल्या पासवर डेविड विलियम्सच्या गोल करण्याचा यत्न जमशेदपूरचा गोरलक्षक टी. पी. रेहेनेशने उत्कृष्ट गोलरक्षण करून उधळून लावला. लगेच डेविडने दिलेल्या पासवर सुभाषिश रॉयला ऐनवेळी चेंडूवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आले.
जमशेदपूर एफसीचा गोलरक्षक टे. पी. रेहेनेशने परत एकदा कमाल करताना लॅनी रॉड्रिग्सचा लाँग रेंजर अडविला. परत एकदा 38 व्या मिनिटाला रेहेनेशने विलियम्सचा गोलमध्ये जाणारा फटका पंच करून होणारा गोल टाळला. मध्यंतराच्या ठोक्याला मार्सेलिनो परेराने केलेल्या कॉर्नरवर संदेश झिंगानचा जबरदस्त हेडर गोलरक्षकाने अडविल्याने वर्चस्व गाजवूनही एटीके मोहन बागानला पहिल्या सत्रात गोल नोंदविता आला नाही.
दुसऱया सत्रातही एटीके मोहन बागानची आक्रमणांची मालिका चालूच राहिली. आरंभालाच मार्सेलिनो परेराच्या पासवर रॉय कृष्णाचा व नंतर संदेश झिंगानचे गोल करण्याचे यत्न निष्फळ ठरल्यानंतर सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना एटीकेच्या यत्नांना अखेर यश आले. डेविड विलियम्सने दिलेल्या पासवर रॉय कृष्णाने जमशेदपूरच्या बचावाला खिंडार पाडत विजयी गोल केला.