सहा कंटेनरमध्ये 120 टन ऑक्सिजन- 30 तासांत 1,880 कि. मी. अंतर पार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य सरकारने केंद्राकडे विनंती केल्यानंतर ऑक्सिजनचा जलदगतीने पुरवठा सुरू झाला आहे. सोमवारी सकाळी जमशेदपूरच्या टाटानगर येथून रेल्वेने सहा कंटेनरमधून 120 टन ऑक्सिजन बेंगळुरात आणण्यात आले. सदर कंटेनर व्हाईटफिल्ड येथील रेल्वेस्थानकावर उतरविण्यात आले. त्यामुळे बेंगळूरमधील कोरोनाबाधितांना आणखी काही दिवस पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.
सोमवारी पहाटे 3.30 वाजता जमशेदपूरहून निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस 29 तास 22 मिनिटांच्या प्रवासानंतर मंगळवारी सकाळी 9.52 वाजता बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड रेल्वे स्थानकावर दाखल झाली. या रेल्वेतून लिक्विड ऑक्सिजन असणारे सहा कंटेनर आणण्यात आले. त्यामुळे राज्याला 120 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. हा साठा टप्प्याटप्प्याने आवश्यक असणाऱया भागांत पाठविण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच रेल्वेने ऑक्सिजन वाहतूक करण्यात आली आहे.
बेंगळूरमध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र, वेळेत ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. दरम्यान, केंद्र सरकारने जमशेदपूर येथून 120 टन ऑक्सिजनसाठा सोमवारी पहाटे रेल्वेने कर्नाटकाच्या दिशेने रवाना केला. सुमारे 1,880 कि. मी. अंतर केवळ 30 तासांत पार करत ऑक्सिजन रेल्वे बेंगळूरमध्ये दाखल झाली. त्यामुळे बेंगळूरमध्ये आशादायक वातावरण निर्माण झाले आहे.