क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत काल बांबोळीतील ऍथलेटीक स्टेडियमवर खेळविण्यात आलेला बेंगलोर एफसी आणि जमशेदपूर एफसी यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला. या निकालाने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण प्राप्त झाला. जमशेदपूरचे दुसरे स्थान कायम राहिले. त्यांचे आता 7 सामन्यांतून प्रत्येकी तीन विजय व बरोबरीने 12 गुण झाले. बेंगलोर एफसीचे 8 सामन्यांतून एक विजय, तीन बरोबरी आणि चार पराभवाने 6 गुण झाले असून ते दहाव्या स्थानावर आहेत.
बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत संधूचा खेळ दमदार राहिला. त्याने जमशेदपूरचे गोल होण्याचे पाच यत्न हाणून पाडले. जमशेदपूर एफसी आणि बेंगलार यांच्यातील पहिल्या हाफमधील खेळ तोलामोलाचा राहिला. 13व्या मिनिटाला जमशेदपूरच्या आलेक्सझांडर लिमाने बेंगलोरच्या तीन डिफेंडर्सना चकवून पेनल्टी कक्षेत प्रवेश केला. पण त्याने दिलेला क्रॉस पास पुढे जाळीत पाठविण्यासाठी कुणीच नव्हता. 21व्या मिनिटाला बेंगलोरच्या क्लायटन सिल्वाने फ्रिकीकवरून गोल करण्याची संधी गमविली.
त्यानंतर 39व्या मिनिटाला आशिक कुरूनियानच्या क्रॉसवर क्लायटन सिल्वाचा हेडर प्रतिस्पर्धी गोलरक्षक टी. पी. रेहनेशने अडविला तर दुसऱया सत्रात परत एकदा सिल्वाने फ्रिकीकवरून गोल करण्याची संधी गमविली. लढतीच्या 73व्या मिनिटाला बेंगलोरने सुनील छेत्रीला संधी दिली. 87व्या मिनिटाला छेत्रीने मारलेला हेडर गोलखांब्याला आदळून परत खेळात आला.
जमशेदपूरच्या गोल करण्याच्या कित्येक संधी निर्माण झाल्या होत्या, मात्र त्यांना बेंगलोर एफसीचा गोलरक्षक गुरप्रीत सिंगचा भक्कम बचाव भेदता आला नाही. त्यानंतर शेवटच्या प्रयत्नात बेंगलोरच्या प्रिन्स इबाराचाही गोल करण्याचा यत्न थोडक्यात हुकला.